अहमदनगर : महिला अत्याचार प्रकरणी आरोपाखाली माजी आमदाराला अटक करण्यात आलीय. विधासनभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदाराला झालेल्या या अटकेमुळे खळबळ उडाली आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा राजकीय सूड आहे का असा प्रश्नही विचारला जात आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांच्यावर अत्याचाराची तक्रार करण्यात आलीय.
advertisement
याबाबत मिळालेली माहिती अशी की, एका महिलेने श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर अत्याचाराची तक्रार केलीय. या प्रकरणी पोलिसांनी भानुदास मुरकुटे यांना अटक केली आहे. राहुरी तालुक्यातली ही महिला असून ती मुरकुटे यांच्याकडे कामाला होती अशी माहिती समजते.
महिलेला वेगवेगळं आमिष दाखवून मुरकुटे यांनी 2019 पासून मुंबई , दिल्लीसह विविध ठिकाणी अत्याचार केल्याची फिर्याद राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता कलम 376, 328,418, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी भानुदास काशिनाथ मुरकुटे यांना श्रीरामपूर येथून मध्यरात्री राहुरी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
भानुदास मुरकुटे यांना श्रीरामपूरमधील निवासस्थानावरून अटक करण्यात आली. महिलेनं सोमवारी सायंकाळी मुरकुटे यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय. मुरकुटे हे मुंबईला कामानिमित्त गेले होते. तिथून परतताच त्यांना रात्री साडे अकरा वाजता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यानंतर अटक करण्यात आली. अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास होत असल्यानं पोलिसांनी त्यांना अहमदनगरमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं आहे.
