अहमदनगर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे 28 हजार 929 मतांनी निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार माजी खासदार सुजय विखे यांचा पराभव केला. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या हाय होल्टेज लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक. या निवडणुकीत सुरुवातीला सुजय विखे यांच्यासमोर कोणी उमेदवार नाही असे वाटत होते. मात्र आमदार निलेश लंके यांनी या निवडणुकीत उडी घेतली. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देखील दिला होता.
advertisement
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके यांना अहमदनगरमधून लोकसभेचं तिकीट मिळालं. त्यानंतर ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवरच्या आणि विकास कामांच्या मुद्द्यावंर लढली जाईल असं वाटत होतं. मात्र प्रत्येक्षात या निवडणुकीमध्ये वैयक्तिक पातळीवरील आरोप-प्रत्यारोपच जास्त गाजले. शरद पवारांनी पहिल्या सभेपासूनच विखे कुटुंबावर हल्ला चढवला. विखेंविरोधात सर्व विरोधक एकवटले. यामध्ये शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्या सारख्या दिग्गचांचा समावेश होता.
मत मोजणीच्या सुरुवातीला भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर ग्रामीण भागात निलेश लंके यांनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम राहिली. या निवडणुकीत मतमोजणीसाठी 27 फेऱ्या होत्या, निकालांती निलेश लंके यांना 6 लाख 24 हजार 769 मते पडली तर खासदार सुजय विखे यांना 5 लाख 95 हजार 868 इतके मते मिळाली यामध्ये 28 हजार 929 मतांनी लंके हे विजयी झाले.
