महाराष्ट्राच्या समाजमनांत धुसमत असलेल्या मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या पंकजा यांच्या मेळाव्याला वेगळेच महत्त्व होते. या मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे, माजी खासदार सुजय विखे पाटील, वाल्मिक अण्णा कराड, ओबीसी आरक्षणासाठी झटणारे नेते लक्ष्मण हाके आदी नेते उपस्थित होते. तसेच या मेळाव्याला पंकजा यांचा लेक आर्यमन याची उपस्थिती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
advertisement
पंकजा यांनी भाषणाला सुरूवात करताच त्यांच्या मुलगा आर्यमन याला लोकांसमोर बोलावून त्याची ओळख करून दिली. पंकजा म्हणाल्या, "हा माझा मुलगा आर्यमन... फार गोड आहे... हा माझ्यापेक्षा फार उंच आहे. यंदा भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय..." पंकजांनी मुलाची ओळख करून दिल्यावर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
पंकजा म्हणाल्या, माझा मुलगा आर्यमन मला फार प्रिय आहे, असे तुम्हाला वाटत असेल. पण त्याच्यापेक्षाही मला तुम्ही प्रिय आहात. कारण गोपीनाथ मुंडे यांनी मरताना तुम्हा सगळ्या लोकांना माझ्या पदरात टाकलंय. तुमचे कल्याण झाल्याशिवाय मी अंतिम श्वास घेणार नाही.
"ज्यावेळी आपल्या कारखान्यावर छापा पडला त्यावेळी माझ्यासमोर बसेलल्या बहाद्दरांनी माझ्यासाठी बारा कोटी जमा केले. लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला, त्यावेळी पाच लेकरांनी माझ्यासाठी जीव दिला. मी माझ्या लेकरांपेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करते. मला बस्स इतकंच पाहिजे, बाकी काही नको..." असे पंकजा म्हणाल्या.