सालाबादाप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तिगडावर संपन्न झाला. या मेळाव्याला प्रथमच त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर माजी खासदार सुजय विखे पाटील, ओबीसी आरक्षणासाठी लढणारे लक्ष्मण हाके, वाल्मिक अण्णा कराड आदी नेत्यांची उपस्थिती होती.
पंकजा मुंडे म्हणाल्या, माझ्या बापाने तुमची जबाबदारी माझ्या पदरात टाकली आहे. ऊसतोड कामगारांचे मला वाईट वाटते. ऊसतोड मजुरांचे जीवन बदलल्याशिवाय मी शेवटचा श्वास घेणार नाही. मी सांगितल्याशिवाय ऊस तोडायला जायचं नाही. मतदान करायला थांबा, आपल्याला आपला डाव खेळायचा आहे. यावेळी झालेली गडबड पुसून टाकायची आहे. त्यासाठी लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
पंकजा मुंडे कुणालाही घाबरत नाही. तसेच कुणालाही अंधारात जावून भेटत नाही. मंत्री असताना जिल्ह्याचा विकास दिला. पदावर असताना कधीही भेदभाव केला नाही. आपल्याला जातीभेद करणारा समाज घडवायचा नाही. जात बघून काम करणारी गोपीनाथ मुंडेंची अवलाद नाही. भगवान बाबांनी फक्त चारित्र्य जपले. इथे चूक चालणारच नाही, असे पंकजा म्हणाल्या.
माझा पराभव झाल्यावर पाच लेकरांनी जीव दिला. निवडून आल्यानंतर जेवढी इज्जत मिळाली नाही, त्यापेक्षा अधिक इज्जत पराभूत झाल्यानंतर मिळाली. जो वंचित पीडित आहे, त्याच्या न्यायासाठी मी राजकारणात आली आहे. माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी राजकारणात नाही. पराभूत झाल्यामुळे मी थकली वगैरे नाही. पुन्हा नव्याने जोमाने तुम्हीही कामाला लागा. जाताजाता एवंढच सांगते की, अब जो भी होगा मैं देखूँगी, जो लिखा काल के भाल पर... काँटे हो या हो अंगारे.. अब चलूँ मैं अपनी चाल पर... एक बहन थी माता थी, काली बनकर लौटी हूँ, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ....!"
