जुन्या भांडणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सानूकुमार ठाकूर असं हत्या झालेल्या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करत साई कुमावत आणि शुभम गायकवाड या दोन आरोपींना अटक केली आहे. दोघांची कसून चौकशी केली जात आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी उशिरा शिर्डी शहरातून दहीहंडीची मिरवणूक काढली होती. ही मिरवणूक संपल्यानंतर आरोपी साई आणि शुभम यांनी सानूकुमारला गाठलं. त्याच्याशी जुन्या कारणातून वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी सोबत आणलेल्या चाकुने सानूकुमारवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की, या हल्ल्यात सानूकुमारचा जागीच मृत्यू झाला.
मयताचे वडील नवीनकुमार बालबोध ठाकूर यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहीहंडीच्या उत्साहात घडलेल्या या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.