धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील देवगाव येथे पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रात्री उशिरा दाखल झाले होते. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना एका तरुणाने कर्जमाफीचा विषय उपस्थित केला. त्यावर अजित पवार यांच्या संतापाचा पारा चढला. कर्जमाफीचा विषय सोडून राज्य सरकार कसे समाजातील सर्व घटकांसाठी काम करते आहे, याचा पाढा अजित पवार यांनी वाचला.
advertisement
जे लोक काम करतायेत त्याचीच मारा, अजित पवार संतापले
अजित पवार म्हणाले, "अरे बाळा, मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतोय. जे लोक काम करतायेत त्याचीच मारता का?" अशा शब्दांत त्यांनी तरुणावर संताप व्यक्त केला. एवढेच नव्हे तर "यालाच मुख्यमंत्री करता का? सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही", असे म्हणत सद्य स्थितीत राज्यातील तिजोरीचा विचार करता राज्य सरकारच्या विचाराधीन कर्जमाफीचा विषय नसल्याचेच एकप्रकारे त्यांनी सांगितले. तसेच आम्ही काय गोट्या खेळायला तुमच्याकडे आलोय का, असे म्हणत तरुणाला सुनावले.
शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊन आता सोयीस्कररित्या दुर्लक्ष
सकाळी सहापासून कामाला लागलोय, हे त्यांचे नेहमीचे पालुपद त्यांनी शेतकऱ्यांसमोर पुन्हा गायले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची घोषणा करण्याऐवजी अजित पवार युवा शेतकऱ्यांवरच संतापलेले पाहून इतर शेतकरीही नाराज झाले होते. विशेष म्हणजे सत्तापक्षातील जाहीरनाम्यांत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा असूनही त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. अजित पवारांच्या असंवेदनशील वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे.
अजित पवार गेली दोन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर
अजित पवार गेली दोन दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करत आहेत. सोलापूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांतल्या विविध ठिकाणी जाऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीही माहिती घेऊन त्यांना धीर दिला तसेच सरकार पाठीशी असल्याचे सांगून लवकरात लवकर मदत जाहीर करण्याचा शब्द दिला.