दरम्यान, अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. मागील नऊ वर्षाच्या काळात भाजपनं पिंपरी चिंचवड महापालिकेचं वाटोळं केलं. इथं प्रचंड भ्रष्टाचार केला, अशा शब्दात आरोप केले आहे. महायुतीचा भाग असलेले अजित पवार असे उघडपणे भाजपवर टीका करत असल्याने आता दोन्ही पक्षातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अजित पवारांनी अडीच तास प्रेस कॉन्फरन्स घेऊन स्वत:च अडचणीत सापडले आहेत.
advertisement
पिंपरी चिंचवड महापालिकेवरून अजित पवारांनी केलेल्या टिकेवरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. अजित पवारांनी खुद के गिरीबान में झाके देखना चाहीए, असं म्हटलं आहे. शिवाय आम्ही आरोप करायला लागलो तर अजित पवारांची अडचण होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांना थेट इशारा
अजित पवारांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता रवींद्र चव्हाण म्हणाले, अजित पवारांचं वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे. ते कोणत्या पक्षाबद्दल बोलतायत. आरोप प्रत्यारोप कसे करावेत, हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो, तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील. याची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे, अशा शब्दांत चव्हाणांनी अजित पवारांना इशारा दिला.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचीही वचक राहिला नाही. त्यामुळे शहरात लुटालूट गँग तयार झाली आहे. या भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. अजित पवार असं का म्हणाले, हे मला माहीत नाही, पण त्यांनी असं बोलायला नको आहे, अशी प्रतिक्रिया देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
