मुंबई महानगर पालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सेना आणि मनसे राजकीयदृष्ट्या व्यवहारिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर विचारले असता, त्यांनी कुटुंबातील विषय असल्याचे सांगत पत्रकारांनाच झापले.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर अजित पवार म्हणाले...
एकाच कुटुंबातील ठाकरे बंधूंनी काय निर्णय घ्यायचा, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. कुणी एकत्र यावे, कुणी दूर जावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. प्रत्येकाला वेगवेगळा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे हे मनसेचे प्रमुख आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांच्या सेनेचे प्रमुख आहेत. त्यांनी त्यांच्या दोन पक्षांसंदर्भात काय भूमिका घ्यायची, हा सर्वस्वी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे अजित पवार म्हणाले. तसेच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर पत्रकारांना काय अडचण आहे? असे म्हणत सुनावले.
advertisement
शिवसेना आणि मनसेतील लोकांना ठाकरे बंधूंनी एकत्र यावे असं वाटत असेल आणि त्यांचेही तसे मत असेल तर कोणत्याही राजकीय पक्षांनी त्यांना सांगण्याची काही एक गरज नाही. कुणालाही नाक खुपसायची गरज नाही. प्रत्येक जण आपल्या सदविवेक बुद्धीला स्मरून निर्णय घेत असतो, असे अजित पवार म्हणाले.
महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे काय म्हणाले?
कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं हे किरकोळ विषय आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, हे वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहणे ही फार कठीण गोष्ट आहे, असे मला वाटत नाही. परंतु विषय इच्छेचा आहे. हा फक्त माझ्या इच्छेचा विषय नाही. माझ्या स्वार्थाचाही विषय नाही. आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर बघणे गरजेचा आहे.महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे, असे मत उद्धव ठाकरेंच्या युतीसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला राज यांनी दिले.