31 ऑगस्ट रोजी माढा तालुक्यातील कुर्डू येथे बेकायदा मुरूम उपसा प्रकरणावरून करमाळा डीवायएसपी असणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा आणि अजित पवार यांच्यातील फोनचे संभाषण व्हायरल झाले. त्यात अजित पवारांनी या महिला अधिकाऱ्याशी बोलताना ज्या पद्धतीने भाषा वापरली, त्यानंतर नवीन वाद निर्माण झाला आहे. तर, याप्रकरणी संबंधित ग्रामस्थांवरच पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कुर्डूतील 15 ते 20 ग्रामस्थांवर सरकारी कामात अडथळा आणि बेकायदा मुरूम उपसाप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
अजित पवार म्हणाले,सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे?
मुरुम कशासाठी उपसला जात होता, मुरुम कोण काढत होते, त्यावेळी, गावाच्या रिॲलिटी चेकमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. या गावातील ग्रामस्थांना रस्त्याच्या अभावी आणि इतरही अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यातूनच ही घटना घडल्याचे समोर आलं. येथील ग्रामस्थांनी पानंद रस्त्यामध्ये गावच्या रस्त्याचे काम सुरू केले होते आणि त्याला हा मुरुम सुरू असल्याचे ग्रामस्थांचे सांगणे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतने ठराव केला होता, याशिवाय सर्व कागदपत्रेही असतानाही आयपीएस कृष्णा यांच्याकडून कारवाईला सुरुवात करण्यात आल्याने वाद सुरू झाला.
ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची
आयपीएस कृष्णा यांना मराठी येत नसल्यामुळे अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन जोडून द्यावा लागला. मात्र, हा उपमुख्यमंत्र्यांचा फोन आणि त्यानंतर ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेली बाचाबाची याचेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वास्तविक कारवाईदरम्यान अंजना कृष्णा या पोलीस गणवेशात नव्हत्या. याशिवाय त्यांच्या सुरक्षारक्षकाने मुरुम घेऊन जाणाऱ्या गाडी ड्रायव्हरला रिव्हॉल्वर लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच, हे काम महसूली असताना आयपीएस असणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाईला सुरुवात केल्याने वादाला तोंड फुटल्याचे ग्रामस्थांचे सांगणे आहे.
चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप
या सर्व प्रकारात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झाल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. मात्र, मुरुम काढण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर परवानगीबाबत किंवा या सर्व प्रकाराच्या व्हायरल व्हिडिओ बाबत ग्रामस्थांकडे कोणतेच उत्तर नाही. दरम्यान, पोलिसांकडून, महसूल अधिकाऱ्यांकडून ज्या पद्धतीने गुन्हे दाखल झाले आहेत ते रद्द करण्याची मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.