मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप करून त्यांना महायुतीत घेऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिले. आताही विधानसभेला मलिक यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी भाजपच्या वतीने प्रचंड दबाव टाकण्यात आला. उमेदवारी निश्चित करण्याकरिता जागावाटपाच्या बहुतांश बैठकांमध्ये मलिक यांच्या नावाला भाजपने विरोध केला.
नवाब मलिक हे अल्पसंख्याक चेहरा असल्याने त्यांना उमेदवारी दिली नाही तर मुंबईसह महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल, अशी अजित पवार यांना भीती होती. लोकसभेला अल्पसंख्याक समाजाने महायुतीला जोरदार दणका दिला होता. विधानसभेला अल्पसंख्याक समाजाचा संभाव्य फटका टाळण्यासाठी अजित पवार यांनी शक्कल लढवली. नवाब मलिक यांना उमेदवारी देणार आहोत, हे त्यांनी जाहीरपणे सांगणे सांगितले.
advertisement
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी त्यांनी नवाब मलिक यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायच्या १० मिनिटे आधी तुम्ही नामांकन अर्जाला एबी फॉर्म जोडा, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या. मलिक यांनीही पक्षाच्या सूचनांचे यथायोग्य पालन केले. बरोबर २ वाजून ५५ मिनिटांनी त्यांनी नामांकन अर्जाला एबी फॉर्म जोडला. त्यामुळे नवाब मलिक आता शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार झाले आहेत.
ज्या भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी मिळू नये म्हणून जंग जंग पछाडले, अजित पवार यांची कोंडी केली, बैठकांमध्ये मलिक यांच्या नावाला तीव्र विरोध केला, त्याच मलिकांना आता राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने महायुती म्हणून त्यांचा प्रचार करण्याची वेळ भाजप-सेना कार्यकर्त्यांवर आली आहे.