नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देताना चारित्र्य तपासा , गुंड आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊ नका अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र पक्षप्रमुखांनी दिलेल्या सूचना धाब्यावर बसवत नांदेडमध्ये गुंड आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्या व्यक्तीला राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश देण्यात आला आहे, अशी चर्चा दबक्या आवजात प्रवेशावेळी सुरू होती.
advertisement
नांदेड शहरातील कुख्यात मटका किंग, गुंड अनवर अली खान याने काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुंड अनवर अली खान याला निवासस्थानी बोलावून प्रवेश दिला. अनवर अली खान हा मटका किंग खान आहे. शिवाय त्याच्यावर मारामारी , बळजबरी जमिनीवर कब्जा करणे , बेकादेशीर शस्त्र बाळगणे , हवेत गोळीबार , बायो डिझेल विकल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत .
अजित दादांच्या आदेशाला केराची टोपली
शिवाय कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंघ रींदा याने घडवलेल्या संजय बियाणी हत्या प्रकरणात देखील अनवर अली खान याची संशयित म्हणून चौकशी करण्यात आली होती. मात्र आता अजित पवारांच्या आदेशाला आमदार प्रताप पाटील चिखलीकरांकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.
स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी करावी : अशोक चव्हाण
दरम्यान गुंडाच्या पक्ष प्रवेशावर खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिली. अशोक चव्हाण म्हणाले, अजित पवारांना दोष देत नाही . मात्र स्थानिक नेतृत्वाने त्यांना न सांगता प्रवेश दिला असावा , कुठल्याच पक्षाने गुंडाना राजाश्रय देऊ नये. अजित पवारांनी या बाबत निर्णय घ्यावा, त्यांनी स्थानिक नेतृत्वाची कानउघाडणी केली पाहिजे.