नरेश अरोरा यांची डिझाईन बॉक्स ही कंपनी लोकसभा निवडणुकीपासून काम करत आहे. अजित पवारांच्या सभांचे नियोजन करणे, अजित पवारांची प्रतिमा जनमानसात कशी जावी यासाठी धोरण ही कंपनी आखण्याचे काम करत आहे. अजित पवारांच्या निवडणूक प्रक्रियेत या कंपनीचा मोठा वाटा आहे. या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रान्चने धडक दिली त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर अजित पवारांनी या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही, असे स्पष्ट केले. तसेच नरेश अरोरा आणि त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचे देखील म्हटले आहे.
advertisement
नरेश अरोरा काय म्हणाले?
नरेश अरोरा म्हणाले, चौकशीसाठी आलेले अधिकारी पुणे गुन्हे शाखेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी कार्यालयातून कोणतीही वस्तू किंवा कागदपत्रे जप्त केलेली नाहीत. अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती मिळाल्यानंतर ते समाधानाने निघून गेले. आमच्याकडे पैसे वाटप होत असते, असे आरोप असते तर इथे काहीतरी सापडले असते. मात्र, येथे काहीही आढळून आले नाही. चौकशीदरम्यान कोणती कागदपत्रे मागितली गेली, याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
कागदपत्रांची माहिती देण्यास नरेश अरोरांचा नकार
हा प्रकार राजकीय कामाशी संबंधित असल्याने अशा चौकशा होत राहतात, असे मत व्यक्त करताना नरेश अरोरा म्हणाले क, मी राजकीय व्यक्ती नाही. गेल्या दहा वर्षांपासून काम करत असून कधीही चुकीचे काम केलेले नाही. मी नेहमी सकारात्मक काम करतो. आपल्याला चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलेले नसल्याचे तसेच पोलीस आयुक्तांशी कोणतेही संभाषण झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या यापुढे राजकीय विषयावर बोलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले नरेश अरोरा आणि त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्रँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशाने उपस्थित झाले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आले. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की, या संपूर्ण विषयात पक्ष हा नरेश अरोरा आणि त्यांची संस्था 'डिझाइनबॉक्स्ड' यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करतो आणि सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर विश्वास ठेवतो. या प्रकरणातही संबंधित यंत्रणांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे. या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा किंवा अनावश्यक नैरेटिव्ह पसरवू नये, असे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो. तथ्यांच्या आधारेच कोणताही निष्कर्ष काढावा, हीच आमची भूमिका आहे.
या संपूर्ण विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयम, जबाबदारी आणि स्पष्टतेसह आपली भूमिका मांडत आहे
