अजित पवार यांच्या विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात हा अपघात किती भीषण होता, याची प्रचिती येत आहे. बारामती विमानतळाच्या बाजुला जळत पडलेला विमानाचा सांगाडा, जळून खाक झालेले मृतदेह हे दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात अजित पवारांची शेवटची आठवण म्हणून एक जळलेला कागद उडत आल्याचं दिसत आहे.
advertisement
हा व्हिडीओ कल्याणी पारखे नरुटे नावाच्या एका तरुणीने शूट केला आहे. इन्स्टाग्रामवरील बायोनुसार, कल्याणी ही मुळची नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. पण तिचं सासर बारामती आहे. बारामतीच्या या सुनेनं अपघात स्थळावर जाऊन हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत अपघातातला एक जळलेला कागद उडत उडत धावपट्टीपर्यंत आल्याचं दिसत आहे. संबंधित कागदावर विमानाच्या चेकींगबद्दल माहिती लिहिली आहे. तसेच त्यावर या विमानाच्या को-पायलट शांभवी पाठक यांची सही देखील दिसत आहे.
अजूनही विश्वास बसत नाही, असं कॅप्शन लिहून कल्याणीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६६ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तिने व्हिडीओत लिहिलं की, "हीच ती जागा जिथे दादा सोडून गेले... दादांची आठवण उडत उडत पायाजवळ आली आणि मन एकदम गहिवरून आलं. एवढं सर्व दिसतंय, तरी विश्वास बसत नाहीये, की दादा आता आपल्यात नाही राहिले..." कल्याणीने शेअर केलेला हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
