महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची बाजू स्पष्ट करत पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासात कोणतीही दिरंगाई झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. रोहित पवार यांनी या प्रकरणी काही तांत्रिक पुरावे, बाबी समोर आणत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या एफआयआरची मागणी फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर रोहित पवार यांनी देशातील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत अजित पवारांच्या अपघाताबाबत प्रश्न उपस्थित करण्याची विनंती, आवाहन केले होते. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी झिरो एफआयआर दाखल केला.
advertisement
अपघाताच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देताना योगेश कदम यांनी माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचा दाखला दिला. कदम म्हणाले, "कोणत्याही मोठ्या अपघातात सुरुवातीला 'एडीआर' (Accidental Death Report) म्हणजेच अकस्मात मृत्यूची नोंद केली जाते. विनायक मेटे यांच्या बाबतीतही आधी एडीआर झाला होता आणि सखोल चौकशीनंतर ५ महिन्यांनी गुन्हा दाखल झाला होता. मी या दोन्ही प्रकरणांची तुलना करत नाही, पण कायदेशीर प्रक्रिया तीच असल्याचे त्यांनी म्हटले.
FIR टाळतोय हा समज चुकीचा
पोलीस प्रशासन किंवा सरकार एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याच्या चर्चांना योगेश कदम यांनी पूर्णविराम दिला. "सरकारला किंवा पोलिसांना एफआयआर करायचाच नाहीये, असा जो मेसेज समाजात जातोय तो अतिशय चुकीचा आहे. आधी अपघाती मृत्यूची नोंद होते, त्यानंतर तांत्रिक बाबींची चौकशी केली जाते आणि मगच एफआयआरची प्रक्रिया पूर्ण होते. यात कुठेही दिरंगाई झालेली नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
