केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा आज अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नुतनीकरण शुभारंभ शाह यांच्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
advertisement
शरद पवार यांच्यावर टीका
अजित पवार यांनी केलेल्या भाषणात अमित शाह यांचे सहकार क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे. अगदी अठराशे, दोन हजार रुपयांपर्यंत साखरचे भाव असायचे. पण एमएसपीनुसार दर मिळायला लागल्यापासून कितीही झाले तरी ३१०० च्या आत साखर विकता येत नाही. अमित शहा यांच्यामुळे सारखं उद्योगाला बळ मिळाले, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांच्याकडून अमित शाह यांचे कौतुक
मॉलेसिसवर २८ टक्के टॅक्स होता, परंतु अमित शाह यांच्या दूरदृष्टीने ५ टक्क्यांवर टॅक्स आणला. त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या संस्था उभ्या राहिल्या. त्यांची ही पावले म्हणजे देश आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या चळवळीला नव संजिवनी देणारी ठरली, असे अजित पवार यांनी विशेषपणे नमूद केले.
पारंपारिक शेती करू नका, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करा
उपलब्ध जमिनीवर, कमी पाण्यात, कमी खतात ऊसाचे जास्त उत्पादन करायला शिका, एआयचा वापर करा, अशा सूचना अमित शाह यांनी दिल्या. यासंदर्भाने काही मदत लागली तर सांगा, एनसीडीसीकडून मदत देतो, असे आश्वासन अमित शाह यांनी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सहकार म्हणजे केवळ संस्था नाही, सहकार म्हणजे केवळ मी नाही तर आपण आहे, तीच महाराष्ट्राची ताकद आहे, असेही अजित पवार यांनी नमूद केले.
पूर्वी बापदादा जसे शेती करत होते, तशी शेती आत्ता करून चालणार नाही. नवे तंत्रज्ञान अवगत करावेच लागेल, असे अजित पवार म्हणाले. ऊसापासून इतर उत्पादने तयार करण्याकरिता मदत करतो, त्यासाठी राज्यातले सहकार कारखाने निवडू. शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करता येईल, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी जाहीररित्या विखे कुटुंबाचे तोंडभरून कौतुक
सहकार ही केवळ आर्थिक यंत्रणा नाही तर ती एक मानवी भावना आहे, ही भावना विखे कुटुंबाने आयुष्यभर जपली, आत्ताही ती भावना जपण्याचे काम विखे कुटुंब करतायेत, अशा शब्दात अजित पवार यांनी विखे कुटुंबाचे कौतुक केले. आजपर्यंत विखे-पवार यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राने अनुभवला होता. लोणीच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी जाहीररित्या विखे कुटुंबाचे तोंडभरून कौतुक केले.