मराठवाड्यातील प्रचंड पावसाने पिके उद्ध्वस्त झाली आहेत, संसार वाहून गेला आहे. शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत. धाराशिव, लातूर, बीड, सोलापूर जिल्ह्यांतील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आहे. भूम तालुक्यातील वालवड येथील फुटलेल्या साठवण तलावाची पाहणी अजित पवार यांनी केली. वालवड गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. तात्काळ तलाव दुरुस्तीच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
advertisement
माझा मुरूम घ्या, माझी खडी घ्या, असला चावटपणा करू नका
गावकरी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधताना अजित पवार यांनी हा तलाव दुरुस्त करून देतो, चांगल्या पद्धतीचे काम करा, असे अधिकाऱ्यांना सांगतो पण तलाव दुरुस्त करताना पुन्हा माझा ट्रॅक्टर लावा, माझा मुरूम घ्या, माझी खडी घ्या... असला चावटपणा करू नका असे अजित पवार म्हणाले. खडी मुरूम असे शब्द अजित पवार यांनी उच्चारताच गावकरी खळखळून हसले.
सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेत- अजित पवार
प्रशासनाला सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पाहणीनंतर अजित पवार यांनी दिली. तुम्ही आणि एकनाथ शिंदे एकाच भागात वेगवेगळी पाहणी करताय, या प्रश्नावर होय मी पाहणीच करतोय, असे मिश्किल उत्तर त्यांनी दिले.
राष्ट्रवादीचे आमदार-खासदार-मंत्री एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरमध्ये जाऊन विविध ठिकाणी पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा केला. अजित पवारांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवारांच्या सर्व आमदार, खासदारांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचे ठरवले आहे.