शरद तुरकर असं हल्ला झालेल्या भाजप नगरसेवकाचं नाव आहे. ते अकोल्यातली प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणुकीला उभे होते. शुक्रवारी निकाल लागल्यानंतर तुरकर विजयी झाले. पण त्यांचा विजयाचा आनंद फार काळ टिकला नाही. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला विरोधी गटाकडून नव्हे तर भाजपच्याच अन्य एका उमेदवाराकडून झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
नेमकी घटना काय?
अकोल्यातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये चार जागांपैकी तीन जागांवर एमआयएम (MIM) पक्षाने बाजी मारली. तर इथून भाजपचे शरद तुरकर हे एकमेव उमेदवार विजयी झाले. या प्रभागातील भाजपच्या पॅनलमधील उमेदवार नितीन राऊत यांचा पराभव झाला होता. तुरकर यांनी केवळ स्वत:साठी एक मत मागितलं. आपला प्रचार केला नाही, याच रागातून नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांकडून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राऊत यांनी असा आरोप केला की, शरद तुरकर यांनी प्रचारादरम्यान फक्त स्वतःसाठीच मते मागितली आणि पॅनलमधील इतर उमेदवारांकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे आपला पराभव झाला. याच रागातून अकोट फैल पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी दगड आणि चाकूचा वापर करून शरद तुरकर यांना लक्ष्य केले. या धुमश्चक्रीत तुरकर यांच्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे.
पोलिसांकडून लाठीचार्ज
या घटनेची माहिती मिळताच दोन्ही गटाचे समर्थक आमनेसामने आले, ज्यामुळे तणाव अधिकच वाढला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमावाला पांगवले. सध्या जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मोठा पोलीस ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
