अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या तामसी नावाच्या गावात ही घटना घडली. आरोपी दीर आणि वहिनी दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी मिळून प्रमोद यांची दोरीने गळा आवळून हत्या केली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यासारखं भासवण्याचा प्रयत्न केला. मृतदेहाच्या पोस्ट मॉर्टेमनंतर वस्तुस्थिती उघड झाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि प्रमोद यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी अकोला मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. कारण त्यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झालेला नसावा अशी शंका त्यांना येत होती. पोलिसांची शंका खरी ठरली. कारण पोस्ट मॉर्टेमचा रिपोर्ट आला, तेव्हा त्यात लिहिलेलं होतं, की प्रमोद यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे नव्हे, तर गळा आवळल्यामुळे झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांना याचा सुगावा लागला, की प्रमोद यांच्या पत्नीचं त्यांच्या चुलत भावाशी प्रेमप्रकरण सुरू आहे.
advertisement
वाचा - लातूर हादरलं, बापाने 6 वर्षांच्या लेकीचा आवळला गळा, नंतर संपवलं आयुष्य!
बाळापूर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पंकज कांबळे यांनी सांगितलं, की दोघांची कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. आपल्या प्रेमप्रकरणाच्या वाटेत अडथळा होत असलेल्या प्रमोद यांना दूर करण्यासाठी त्यांनी त्यांचा खून करण्याचा निर्णय घेतला. आता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या अत्यंत धक्कादायक प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पती-पत्नीच्या पवित्र नात्याला, तसंच भावा-भावांच्या पवित्र नात्यालाही यामुळे काळिमा फासला गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
