40 वर्षीय सुमेध मेश्राम हे मूर्तिजापूर रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस म्हणून काम करत होते. बुधवारी रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ड्युटीवर असताना, त्यांनी अचानक भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडीसमोर उडी मारली. रेल्वेने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
मेश्राम यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यात सुमेध मेश्राम यांच्याविरुद्ध पोक्सो कायदा आणि इतर कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल आहेत. 14 वर्षीय पीडितेने आरोप केला होता की, सुमेध मेश्राम यांनी तिला घरातील सामान बाहेर काढण्याच्या बहाण्याने मूर्तिजापूरमधील एका कॉलनीत बोलावले आणि जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. तसंच मेश्राम यांनी मुलीला धमकी दिली की, जर तिने कोणाला सांगितले तर तिच्या आईलाही मारून टाकेल.
काही दिवसांनी, घाबरलेल्या मुलीने धाडस केले आणि तिच्या आईला घटनेची माहिती दिली. यानंतर, कुटुंबीयांनी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सुमेध मेश्राम यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 4 आणि 6 सह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास मूर्तिजापूर पोलिसांकडे सोपवण्यात आला. यानंतर पोलीस आरोपी सुमेध मेश्रामला अटक करणारच होते, पण त्याआधीच त्याने मालगाडीसमोर येऊन जीवन संपवलं. रेल्वे पोलिस अधिकारी अर्चना गडवे यांनी सांगितले की, शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे आणि सर्व पैलूंचा तपास केला जात आहे.
टीप:- (जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीला आत्महत्येचा विचार आला तर ही एक अतिशय गंभीर वैद्यकीय आणीबाणी आहे. भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 वर त्वरित संपर्क साधा. तुम्ही 1800914416 या टेलिमानस हेल्पलाइन क्रमांकावर देखील कॉल करू शकता. येथे तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी तज्ज्ञ तुम्हाला आवश्यक सल्ला देतील. लक्षात ठेवा, जीवन हेच सर्वस्व आहे.)