अक्षय सुभाष पाटील असं आरोपीचं नाव आहे. तर अभयकुमार पाटील असं जखमी वडिलांचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय याने अभयकुमार यांच्याकडे त्यांच्या मुलीसाठी मागणी घातली होती. पण अभयकुमार यांनी लग्नास नकार दिला. लग्नास नकार दिल्याने अक्षयला प्रचंड राग आला होता. तो नकार पचवू शकला नाही. गावकऱ्यांनी अक्षयची समजूत घातली, तरीही त्याचा राग कमी झाला नाही.
advertisement
दरम्यान, अभयकुमार पाटील यांनी आपल्या मुलीचं इतर ठिकाणी लग्न ठरवलं होतं. रविवारी त्यांच्या मुलीचा साखरपुडा देखील ठरला होता. अशातच अक्षयने अभयकुमार यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला. तो बॅगेत खुरपं घेऊन मुलीच्या घराजवळ आला. याठिकाणी अभयकुमार दिसताच त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने खुरप्याने अभयकुमार यांच्या डोक्यात वार केले. अचानक हल्ला केल्याने अभयकुमार स्वत:ला वाचवू शकले नाहीत. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.
याचवेळी त्यांची मुलगी तिथे आली, तिने भांडणात मध्यस्थी करत वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षयने तिच्यावर देखील हल्ला केला. या हल्ल्यात वडील आणि मुलगी दोघंही गंभीर जखमी झाले. तर मुलीचं बोटही तुटलं आहे.
या हल्ल्यानंतर अक्षय पाटील तिथून पळून गेला. खुरप्याच्या वारात गंभीर जखमी झालेले वडील आणि मुलगी या दोघांनाही तत्काळ मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्या दोघांवरही उपचार सुरू आहेत. दरम्यान या हल्ल्याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस तत्काळ रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत हल्लेखोर अक्षय पाटील याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या फरार असून मिरज पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. लग्नास नकार दिल्याच्या कारणातून अशाप्रकारे जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
