कारवाईने घर पडलं, पण हिंमत नाही!
मार्च २०२५ मध्ये नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या दंगलीने शहर हादरले होते. या दंगलीत फहीम खान यांचे नाव प्रमुख आरोपी म्हणून समोर आले. त्यानंतर प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत, उत्तर नागपुरातील संजय बाग कॉलनीतील खान यांचे दुमजली घर अनधिकृत बांधकामाचे कारण देत जमीनदोस्त केले. एका रात्रीत कुटुंब रस्त्यावर आले आणि फहीम खान यांची रवानगी चार महिन्यांसाठी तुरुंगात झाली. "घर पाडले गेले, पण माझी जिद्द आणि हिंमत कोणीही पाडू शकले नाही," असे अलिशा खान आज अभिमानाने सांगतात.
advertisement
प्रभाग ३ मध्ये 'बुलडोझर'च ठरला निवडणुकीचा मुद्दा
या कारवाईनंतर खान कुटुंबाने कायदेशीर लढाईसोबतच लोकशाहीचा मार्ग निवडला. प्रभाग क्रमांक ३ (महिला राखीव) मधून अलिशा खान यांनी एमआयएमच्या तिकिटावर नशीब आजमावले. प्रचारादरम्यान नागरी प्रश्नांपेक्षाही प्रशासनाने केलेल्या बुलडोझर कारवाईचा आणि अन्यायाचा मुद्दा जास्त गाजला. हिंदू-मुस्लिम मिश्र वस्ती असलेल्या यशोधरानगर परिसरातील नागरिकांनीच अलिशा खान यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला होता.
निकाल आणि भाजपचा पराभव
निकालाच्या दिवशी अलिशा खान यांनी भाजपच्या भाग्यश्री कानतोडे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले. अखेर अलिशा खान यांनी ९,४५५ मते मिळवत भाजपच्या उमेदवाराचा सुमारे १९०० मतांनी पराभव केला. नागपुरात एमआयएमचे एकूण ६ उमेदवार निवडून आले असले, तरी अलिशा खान यांचा विजय सर्वात जास्त चर्चेत आहे.
जनतेची भावना विजयाचं कारण
"आमच्यावर अन्याय झाला, ही भावना केवळ आमच्या कुटुंबापुरती नव्हती, तर संपूर्ण परिसरातील लोकांच्या मनात होती," असे अलिशा खान विजयानंतर म्हणाल्या. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच एका सामान्यातल्या सामान्य घरातील महिला, जिचे घर प्रशासनाने पाडले होते, ती आज त्याच प्रशासनाला जाब विचारण्यासाठी नगरसेविका म्हणून निवडून आली आहे.
