नाशिकमधील गिरीश महाजन यांच्या एका समर्थक असलेल्या माजी नगरसेवकाने भाजपच्या आमदाराची सुपारी दिल्याचा मोठा दावा दानवे यांनी केला आहे. राज्यात आधीच गँगवॉरच्या घटना घडत आहेत. अशात अंबादास दानवे यांनी थेट भाजप आमदाराला मारण्याची सुपारी दिल्याचा गौप्यस्फोट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर आता महाजन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
अंबादास दानवे यांच्याकडे सुपारी दिल्याचे काही पुरावे असतील, तर त्यांनी द्यावे, असं गिरीश महाजनांनी म्हटलं आहे. असा कुठलाही प्रकार झालेला नाही. तसेच कुणाची अशी तक्रार देखील आली नाही. त्यामुळे दानवेंचं विधान म्हणजे हास्यास्पद आहे, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. या संदर्भात अंबादास दानवे यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांना द्यावे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अंबादास दानवे यांनी नेमका गौप्यस्फोट काय केला होता?
उद्धव ठाकरेंनी घरात बसून पाहणी करावी, या महाजनांच्या टीकेला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले, " गिरीश महाजनांची औकात आहे का? उद्धव ठाकरेंवर टीका करायची. गिरीश महाजनांना सपोर्ट करणाऱ्या एका माजी नगरसेवकानं नाशिकमधील भारतीय जनता पार्टीच्याच एका आमदाराला मारण्याची सुपारी दिली आहे. गिरीश महाजनांचं समर्थन करणारा नाशिकचा माजी नगरसेवक आणि भाजपचा आमदार, या दोघांची नावं मला माहीत आहेत. पण ती नावं मी सांगणार नाही, तुम्ही शोधा. याची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना देखील आहे. त्यामुळे गिरीश महाजनांनी आधी याचा तपास करावा, हा नगरसेवक कोण आहे? त्याने का सुपारी दिली, त्यावर कारवाई करावी, यानंतर आमच्यावर टीका करावी."
