राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवून दिली. अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओत एक व्यक्ती पैशांचं बंडलं मोजत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओत शिवसेना आमदार महेंद्र दळवी असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय. या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
advertisement
अंबादास दानवेंच्या या आरोपानंतर राजकारण तापलं आहे.या व्हिडिओचा धागा पकडत विरोधकांनी महायुती सरकारला घेरलंय. दानवेंच्या या आरोपानंतर शिवसेना आमदार महेंद्र दळवी पुढे आले. त्यांनी दानवेंचे आरोप फेटाळून लावलेत. दानवेंनी फोडलेला कॅश बॉम्ब आणि त्यानंतर विरोधकांनी डागलेल्या आरोपांच्या फैरीनंतर महायुतीचे नेतेही पुढे सरसावलेत. बेछूट आरोप करत बदनामीचा प्रयत्न असल्याचा पलटवार सत्ताधाऱ्यांनी केला आहे.
रायगडच्या राजकारणात शिवसेना आमदार आणि सुनील तटकरेंमधील वाद सर्वश्रूत आहेत.आता या प्रकरणालाही या वादाशी जोडण्याचा प्रयत्न शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी केलाय. यापूर्वी मंत्री शिरसाटांचा खोलीत पैशांची बॅग घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या या कॅश बॉम्बमुळं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.नागपुरात ऐन थंडीत सुरू असलेल्या अधिवेशनाचं वातावरण अंबादास दानवेंच्या या कॅश बॉम्बमुळं तापलंय.
