अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवारांकरीता रिसॉर्ट डिप्लोमसीला निकालाआधीच सुरुवात झालीये. उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. पण छाननीत भाजपाच्या ५ आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने सत्ता स्थापन करण्याकरीता दोघांनाही अपक्षांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यामुळे आपले उमेदवार अज्ञात स्थळी हलविण्याला राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. सोबतच अपक्ष उमेदवारांना देखील आलिशान हॉटेलमध्ये सुरक्षिततेत ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
भाजपच्या उमेदवारांना मुंबईत तर शिवसेनेच्या उमेदवारांना ठाण्यात हलविण्यात आले
भाजपाला ५ ते ७ तर शिवसेनेला ३-४ अपक्ष उमेदवारांची गरज पडणार असून त्यांना आधीच पुरस्कृत केले जाईल, जेणेकरून निवडणूक जिंकल्यास त्यांचा आपल्यालाच पाठिंबा मिळेल अशी रणनीती भाजपा आणि शिवसेनेकडून आखली गेलीये. भाजपच्या उमेदवारांना मुंबईत तर शिवसेनेच्या उमेदवारांना ठाण्यात हलविण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
अपक्षांना सोन्याचा भाव
दुसरीकडे भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने अपक्ष उमेदवारांना सोन्यापेक्षा जास्त भाव आला असून अपक्षांचा मोठा घोडेबाजार केला जाणार आहे असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय.
