गोंदिया : गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रस्त्याने जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला अचानक आग लागली आहे. आग लागल्यानंतर ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. सुदैवाने या दुर्घनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंडीपार–तेढा मार्गावर ही घटना घडली. या परिसरात असलेल्याा मांडोदेवी वर्कशॉप इथं आणलेली पीएससी रुग्णवाहिकेमध्ये अचानक आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणात भडका उडाला आणि काही क्षणात रुग्णवाहिका जळून खाक झाली. दरम्यान, ॲम्बुलन्समध्ये ठेवलेला ऑक्सिजन सिलेंडर स्फोट झाल्याने मोठा आवाज झाल्याने संपूर्ण मुंडीपार परिसर हादरून गेला. मात्र, या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
advertisement
ही ॲम्बुलन्स काही दिवसांपूर्वी बिघाड झाल्याने गोंदिया येथून टोचनद्वारे (टोचन वाहनाने बांधून) मुंडीपार येथील मांडोदेवी वर्कशॉपमध्ये आणण्यात आली होती. गाडी वर्कशॉपच्या परिसरात उभी केल्यानंतर अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला. काही क्षणातच आगीने पेट घेतली आणि काही कळायच्या आत आगीने रौद्ररूप धारण केलं.
यावेळी रुग्णवाहिकेत असलेल्या ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, परिसरातील नागरिक बाहेर पडून घटनास्थळी धावत आले. लगेचच मुंडीपार पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. ॲम्बुलन्स पूर्णपणे जळून खाक झाली असून आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गाडीच्या विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास गोरेगाव पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.