तब्बल तीन दशकानंतर महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाला १३० हून अधिक जागा जिंकल्या आल्या आहेत, अर्थात तो पक्ष आहे भाजप... विधानसभेत ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्या खांद्यावर पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यासाठी भाजपचे शिर्डीत अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी महत्त्वाच्या महापालिका आणि त्याबरोबरच जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे.
advertisement
विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका, पंचायत ते संसद भाजपच असली पाहिजे
अमित शाह यांनी भाषणात विधानसभेच्या विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. विकासाचे वर्तुळ तेव्हाच पूर्ण होते जेव्हा पंचायत ते संसद एकाच पक्षाचे सरकार असते. आता विधानसभेत आणि संसदेत भाजप आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचेच उमेदवार निवडून आले पाहिजेत. विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका, पंचायत ते संसद भाजपच असली पाहिजे, असे अमित शाह म्हणाले.
आपल्याशी धोका करण्याची पुन्हा कुणाची हिम्मत होऊ नये
पक्षाची दीड कोटी सदस्य नोंदणी लवकरात लवकर करून आगामी निवडणुकीसाठी पुन्हा जनतेच्या दारोदारी जाऊन सरकारच्या योजना पोहोचवा, असे निर्देश अमित शाह यांनी दिले. आपल्याशी धोका करण्याची पुन्हा कुणाची हिम्मत होऊ नये, यासाठी आपल्याला पक्षाचे संघटन मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे शाह कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.
उद्धव ठाकरे-शरद पवारांवर सडकून टीका
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणे टाळले होते. परंतु विधानसभेत ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर शिर्डी होत असलेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. शरद पवार यांनी कायमच दगाफटक्याचे राजकारण केले. त्यांचे राजकारण २० फूट जमिनीत गाडण्याचे काम राज्यातील जनतेने केले तसेच बाळासाहेबांची विचारधारा सोडून गद्दारी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जनतेने दागा दाखवली, अशा शब्दात अमित शाह यांनी दोन्ही नेत्यांवर तोफ डागली.
