अमरावती : विहिरी तर अनेक बघितल्या असतील. पण, विहिरीला बारा दरवाजे, विहिरीच्या आतमध्ये खोल्या, मंदिराचे गोल घुमट या सर्व गोष्टी असणारी विहीर आहे म्हटल्यावर आश्चर्यच वाटेल ना. तर अशी विहीर आहे अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात असलेल्या पवनी सक्राजी या गावात. 150 वर्ष पुरातन अशी ही विहीर सातपुते यांच्या शेतात आहे. या विहिरीला बाराद्वारी विहीर म्हणून संबोधले जाते. ही विहीर गोपाळराव सातपुते यांनी बांधलेली आहे, अशी माहिती येथील ग्रामस्थ सांगतात.
advertisement
गोपाळराव सातपुते यांचे विहीर बांधताना त्यांचं स्वप्न होते की, विहिरीच्या आतमध्ये मंदिर असावं. विहिरीच्या आत मंदिरासारखी खोली तर आहे, पण त्यामध्ये कोणतीही मूर्ती नाही. गोपाळराव यांचं मंदिराच स्वप्न अपूर्ण राहिल्याचं देखील तेथील नागरिक सांगतात.
पवनी सक्राजी या गावातील 150 वर्ष प्राचीन असलेल्या या विहिरिबाबत लोकल 18 च्या प्रतिनिधीने मोहन घारड यांच्याशी चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, माझे आजोबा यांना गोपाळराव सातपुते यांनी दत्तक घेतले होते. त्यामुळे सर्व जमीन माझ्या आजोबांच्या नावावर झाली आणि ती आता आमच्याकडे आहे. ही विहीर 150 ते 200 वर्ष जुनी आहे. गोपाळराव सातपुते यांनी त्या काळात ही विहीर बांधली तेव्हा त्यांचे दोन उद्देश असल्याची माहिती आहे. एक म्हणजे गावकऱ्यांना पाणी पुरवठा होणे. दुसरा म्हणजे गावातील लोकांना एखादे मंदिर किंवा काही तरी आकर्षक असं पर्यटन स्थळ असावं. त्या हेतूने त्यांनी विहिरीमध्ये मंदिर बांधायचे ठरवले. पण ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
नाशिकमध्ये थंडीची लाट, बाप्पाही दिसले उबदार कपड्यांत, पंचवटीत भाविकांची गर्दी
विहिरीची विशेषता
या विहिरीचे विशेष म्हणजे ही विहीर आजण नावाच्या लाकडावर उभारण्यात आली आहे. विहिरीच्या आत सर्वात आधी लाकूड आहे आणि त्यानंतर इतर साहित्य विटा, माती हे दिसून येते. त्याचबरोबर खरप नावाचा दगड येथे पिलर उभारणीसाठी वापरला आहे. हा दगड सालबर्डी येथून आणलेला असल्याचं देखील समजते. त्याचबरोबर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे गोमुख असलेले चार झरे सुद्धा या विहिरीमध्ये आहे. विहिरीच्या टोकावरील भिंतीवर सुंदर नक्षीकाम आहे. ज्यात राम लक्ष्मण, पालखी आणि इतर देवांची चित्रे रेखाटली आहे. त्याच भिंतींच्यावर भव्य असे हौद आहे. ज्यात बैलांच्या साहाय्याने पाणी ओढून ते पुढे शेतीसाठी वापरत होते.
पुढे ते सांगतात की, विहिरीच्या आतमध्ये दहा बाय दहाच्या खोल्या आहेत. त्याचबरोबर एक मंदिर आहे आणि 12 दरवाजे आहेत. विहिरीमध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्गात काही दगडाच्या तर काही मातीच्या पायऱ्या तिथे आहेत. विहिरीच्या आत गेल्यावर तुम्हाला राजवाड्यात आल्यासारखे वाटेल. या विहिरीला 12 दरवाजे असल्याने या विहिरीचे नाव बाराद्वारी असे पडले आहे, असे मोहन घारड यांनी सांगितले.





