कोल्हापुरातील अमृतधारा दुग्धपेढी. कोल्हापुरातील ‘सीपीआर’मध्ये नवजात बालकांसाठी मिल्क बँक साकारली आहे. इथं स्तनदा माता अतिरिक्त दूध दान करतात. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर लवकरच याचा विस्तार प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. या बँकेत मिल्क साठवण्याच्या अत्याधुनिक मशीनच्या किमती लाखोंच्या घरात आहेत. अशी माहिती छ. प्रमिला राजे रुग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ भूषण मिरजे यांनी दिली.
advertisement
मिल्क बँकेची कार्यपद्धती कशी?
ज्या अर्भकांचा प्रिमॅच्युअर जन्म झालाय, किंवा ज्यांची माता त्यांना जन्माच्या वेळीच सोडून गेलीय, ज्या मातांना मेडिकल प्रॉब्लेम्समुळे स्तनपान करणं शक्य होत नाही अशांना या दुग्धरूपी अमृताची नितांत गरज असते. मात्र अशावेळी जर पर्यायी दुधाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्या स्तनदा मातेची सोय झाली नाही तर अशा बाळांना वरचं दूध द्यावं लागतं. हे दूध अनेक बाळांना पचत पण नाही तर अनेकांना आयुष्यभर याचे परिणाम सहन करावे लागतात. अशा परिस्थितीमध्ये ही बँक सर्वोत्तम आहे.
मानवी दुधाच्या बँकेसाठीचे दाते हे सीपीआर रुग्णालयातील स्तनदा माता असतात. हे दूध पंपाच्या साहाय्याने एका कंटेनरमध्ये जमा केलं जातं. याअगोदर नियमानुसार दुग्धदान करणाऱ्या आईला एचआयव्ही. कावीळ बी, सी, आणि अशा विविध तपासण्या केल्या जातात. मग या दुधाचं पाश्चरायझेशन केले जातं. त्यानंतर हे दूध ४ डिग्री सेल्सिअसवर ३ दिवसांपर्यंत व २० डिग्री सेल्सिअसवर १२ तासांसाठी साठवून ठेवले जातं. मग जशी गरज पडेल तसे हे दूध गरजू नवजात बाळांना दिलं जातं. कोल्हापुरातील या मिल्क बँकेमध्ये महिन्याला साधारण १०० ते ११० महिला दुग्धदान करतात.
बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि मानसिक तणावांमुळे मातांना दूध येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आईला दूध कमी येण्याची समस्या जास्तकरून शहरी भागात पाहायला मिळते. एकीकडे ही परिस्थिती असताना ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये जास्त दूध येतं. त्यांना स्तन कडक होणे, दुखणे अशा समस्या उद्भवतात. म्हणून बऱ्याचदा स्त्रिया हे जास्तीचे दूध काढून फेकून देतात. या मिल्क बँकेच्या माध्यमातून हा असमतोल दूर करून दूध कमी येणाऱ्या आणि दूध जास्त येणाऱ्या दोन्ही मातांना लाभ होतो.
महिन्याला ४ ते २० बालकांना जन्मदात्या मातेच्या दुधापासून राहावं लागतं वंचित
एका सर्वेक्षणानुसार, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आठवड्याला एक ते पाच नवजात तर महिन्याभरात ४ ते २० बालकांना जन्मदात्या मातेच्या दुधापासून वंचित रहावे लागतं. अशा बाळांना सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री, अपरात्री केव्हाही भूक लागताच ती रडू लागतात. अशावेळी त्या बालकाला दूध द्यावे कोठून? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतो. बालकांचे पालक हवालदिल होतात. आणि त्यांच्याकडून मातेचे दूध तत्काळ उपलब्ध करू शकत नाहीत. यावरच उपाय म्हणून राज्य शासनामार्फत पश्चिम महाराष्ट्रातील पहिली आणि जिल्ह्यातील एकमेव स्तनदा माताकडून अतिरिक्त दूध संकलन करून ते शीतकरण यंत्रणेत साठवून ठेवले जाते आणि ते अशा बालकांना देण्याची सोय अमृतधारा दुग्ध पेढी अर्थातच मदर्स मिल्क बँकेतून केली जात आहे.