पालघर: राज्यभरात एकीकडे पावसाने धुमशान घातलं आहे. मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच पालघरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पालघरजवळ रेल्वे मार्गावर अमृतसर एक्स्प्रेसचे डबे वेगळे झाल्याची घटना घडली आहे. अचनाक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या एक्स्प्रेससोबत ही घटना घडली. डहाणू स्थानकाजवळ पोहोचल्यानंतर अमृतसर एक्स्प्रेसचे दोन डबे अचानक वेगळे झाले. अचानक गाडीचा वेग कमी झाल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. बाहेर येऊन पाहिले असताना एक्स्प्रेसचे दोन डबे वेगळे झाल्याचं निदर्शनास आलं.
काही प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या टाकल्या. रेल्वे रुळावर दोन डबे वेगळे झाले होते. अमृतसर एक्स्प्रेसच्या लोको पायलटने तातडीने रेल्वे थांबवली. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. या घटनेमुळे डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला. डाऊन मार्गावरील वाहतूक चाळीस मिनिटं ठप्प झाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती तातडीने रेल्वे विभागाला देण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अमृतसर एक्स्प्रेसचे वेगळे का झाले, याची पाहणी करत आहे. अमृतसर एक्स्प्रेसचे डबे पुन्हा जोडण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या दुर्घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेचा तपास रेल्वे कर्मचारी करत आहे.