दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी हे गाव सीना नदी पात्रापासून 200 ते 300 मीटर अंतरावर आहे. नदीला आलेल्या महापुरामुळे या गावाला जबरदस्त फटका बसला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून अनेकांच्या राहत्या घरामध्ये देखील पाणी शिरलं आहे. डोक्यावरच छत हरपल्यानं मनगोळी गावात राहणाऱ्या परशे कुटुंबाने एका ट्रकमध्ये आपला संसार मांडला आहे.
advertisement
Weather Alert: कुठं रेड, तर कुठं ऑरेंज अलर्ट, पश्चिम महाराष्ट्राचं टेन्शन वाढवणारं अपडेट
सोमवारी (22 सप्टेंबर) पहाटे 5 वाजता सीना नदीचं पाणी मंगल परशे यांच्या घरात आलं. पाणी आल्याचं पाहून मंगल परशे यांनी घरामधील सर्वांना झोपेतून उठवलं. घरामधील थोडंफार संसार उपयोगी साहित्य घेऊन या कुटुंबाने घर सोडलं. अचानक आलेल्या महापुरामुळे डोक्यावरचं छत गेलं. शिवाय गावात त्यांना अचानक कुठे निवाराही मिळत नव्हता. तेव्हा गावात राहणाऱ्या समाधान यांनी त्यांना राहण्यासाठी स्वतःचा ट्रक दिला. गेल्या सात दिवसापासून मंगल परशे यांच्यासह 10 ते 12 जण या ट्रकमध्ये राहत आहेत.
सीना नदीला आलेल्या महापुरामुळे पै-पै जमा करून उभं केलेलं घर, घरातील साहित्य, नातवंडाची दप्तरं, तीन शेळ्यांची पिलं वाहून गेली आहेत. पाणी ओसरल्यानंतर मंगल परशे घर पाहण्यासाठी गेल्या असता घरात गुडघ्याभर पाणी असल्याचं विदारक दृश्य त्यांना दिसलं.
सोलापूर जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.