मिळालेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही संतापजनक घटना घडली. अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या आईला आरोपीने मुलीच्या अंगातून 'भूत काढतो' असं खोटं सांगून विश्वासात घेतलं. या बहाण्याने त्याने पीडित मुलीसह तिच्या आईला आपल्या चारचाकी गाडीतून श्रीवर्धन येथे आणलं.
श्रीवर्धन येथे पोहोचल्यावर आरोपीने पीडितेच्या आईला समुद्रकिनारी थांबण्यास सांगितलं. आईला दूर केल्यानंतर, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला एकटं गाठलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली.
advertisement
या गंभीर घटनेची नोंद श्रीवर्धन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे या स्वतः करत आहेत. पोलीस आरोपीचा कसून शोध घेत असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. अंगातून भूत काढण्याच्या नावाखाली नराधमाने अशाप्रकारे अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
