रविवारी, बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. या परिषदेत बच्चू कडू, महादेव जानकर दीपक केदार उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी शेतकऱ्याला आपण जर विचारलं की तुला काय येतं तर त्याला काहीच येत नाही. मग आत्महत्या का करतो, अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाक असा संताप बच्चू कडू यांनी व्यक्त केला. या परिषदेत दीपक केदार यांनीही सरकारवर शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत ठरवत संताप व्यक्त केला.
advertisement
बच्चू कडू यांनी म्हटले की, ही वेदनाची परिषद दुःखाची परिषद आहे व दिवाळीच्या दिवशी ही घ्यावी लागत आहे.तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केली त्यामुळे शेतकरी मागे राहिला. शेतकऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात असेही वक्तव्य केले. मोर्चे-मेळावे, प्रचाराला गर्दी असते मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी असते याकडेही त्यांनी लक्ष वेधून घेतले.
बाबासाहेबांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपविली. शरद जोशी यांनी तुमच्यासाठी काही कमी केलं का ? अडीच लाख पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले. या सरकारने शेतकऱ्यांना भगवा हिरवा निळा रंगात वाटलं आणि त्यामुळे शेतकरी वाटला गेला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जातीपेक्षा शेतकरी महत्त्वाचा...
शरद जोशींना शेतकऱ्यांनी पाडलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही पाडलं, मलाही शेतकऱ्यांनीच पडलं. मी जातीत बसलो नाही. तुम्ही असंच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही अशी खंतही कडू यांनी व्यक्त केली. लोकसभेची निवडणूक असताना तुम्ही कापसाला भाव मागितला का...? सोयाबीनला भाव मागितला का..? तुम्ही जात पाहिली...पण सर्व जाती याच मातीमुळे जगतात हे विसरू नका. शेतकरी हे सगळ्या जातीत सापडतात असेही त्यांनी म्हटले.
सरकार डुक्करासारखं आहे...
सरकार हे डुकरासारखं आहे. डुक्कर परवडलं पण सरकार नाही अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. शहरातले आमदार परवडले पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. शहरातल्या आमदारांचे मस्त असतं हप्ते वसूल केले की झालं. तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येतं. आमच्या मालाला भाव मिळाला तर आम्ही लोकांना नोकरीला ठेवू. आरक्षणामुळे एखादी परिवार किंवा समाज सुखी होऊ शकतो मात्र मालाला भाव मिळाला तर अख्खा गाव सुखी होऊ शकेल असेही त्यांनी म्हटले. शेतकऱ्यांना जाती धर्मात विभागल्याने शेतकरी एकत्र येत नाही नाहीतर सरकार एका दिवसात सरळ होईल असेही कडू यांनी म्हटले.