सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड: बीडसह राज्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. बीडच्या अंबाजोगाईत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नृत्याची आवड असलेल्या मुलीला कलाकेंद्रात काम देण्याच्या आणि पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने अंबाजोगाईला आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
advertisement
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, एका महिलेसह चार जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा गुन्हा आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये वर्ग करण्यात आला आहे. या घटनेमुळे बारामतीसह बीड जिल्हा हादरला असून, कलाकेंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या या अनैतिक धंद्यांवर संताप व्यक्त होत आहे.
कामाचं आमिष अन् कलाकेंद्रात...
बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील एका महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. २४ एप्रिल २०२५ रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ या महिलेने तक्रारदारांशी संपर्क साधला होता. आपल्या कलाकेंद्रात नृत्यासाठी मुलींची गरज असून, मुलीला पाठवल्यास ती नृत्यही शिकेल आणि तिला पैसेही मिळतील, असे आमिष बदामबाईने दाखवले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने मुलीला पाठवण्याची तयारी दर्शवली. मात्र मुलीला अंबाजोगाई येथील 'पायल कलाकेंद्र' येथे नेले असता तिने तिथे राहण्यास नकार दिला. त्यानंतर बदामबाई आणि इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली.
या मारहाणीनंतर पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील 'साई लॉज'वर नेण्यात आले. तेथे बदामबाईने पीडितेला तीन पुरुषांच्या ताब्यात दिले आणि ती निघून गेली. लॉजवर उपस्थित असलेल्या मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीने पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला पुन्हा गाडीतून पायल कलाकेंद्र येथे आणून सोडण्यात आले. त्यानंतर तिच्यावर वेश्याव्यवसाय करण्यास बळजबरी प्रयत्न झाला.
अत्याचारानंतर पीडितेने कशीबशी आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून घडलेला भयंकर प्रकार सांगितला. घाबरलेल्या आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला परत बारामतीला आणले. यानंतर पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी बदामबाई गोकुळ, मनोज कालिया, प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिथून हा गुन्हा अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आरोपींचा शोध सुरू आहे.
