आधीच बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं आहे. अशात शिवराज दिवटेला झालेल्या मारहाणीनंतर बीडमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही? असा सवाल विचारला जात आहे. या मारहाणीच्या व्हिडीओनंतर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात होता. बीड दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांना या संतापाला सामोरे जावे लागले आहे.
अजितदादांना घेरलं...
परळी भेटीवर आलेल्या अजितदादांना घोषणाबाजीला सामोरे जावे लागले. परळीमध्ये अजितदादा पवार यांच्यासमोर कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी करण्यात आली. न्याय द्या...न्याय द्या...अजितदादा न्याय द्या अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. परळी शासकीय विश्रामगृहासमोर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवला. यावेळी अजित पवारांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
advertisement
प्रकरण काय?
16 मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला परळी तालुक्याच्या लिंबोटी येथील रहिवासी असणारा शिवराज दिवटे मित्रांसोबत गेला होता. तेथे किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादानंतर मुंडे गँगने शिवराजचं अपहरण करून डोंगरात नेलं. तिथे आरोपींनी रिंगण करून बेदम मारहाण केली. त्यानंतर पायाही पडायला लावले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
शिवराजच्या जबाबावरून पोलिसांनी 20 जणांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 7 जणांना ताब्यात घेतलं आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.