उद्धव विनायकराव हाडबे (वय 39, मूळ रा. आडबेवाडी, सध्या रा. परळी) हे वृत्तपत्र वितरणाचे काम करतात. 24 डिसेंबर रोजी त्यांच्या पत्नी राजश्री यांचा शेजारी राहणारे सुनील राऊत व त्यांची पत्नी रूपाली राऊत यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या भांडणाबाबत तक्रार देण्यासाठी हाडबे कुटुंब पोलिस ठाण्यात जाण्याच्या तयारीत असताना, राजश्री यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर हे कुटुंब पुण्याला लग्नाच्या खरेदीसाठी गेले होते.
advertisement
पती बसचालक, तर पत्नी वाहक; कष्टानं उभारला संसार, पण क्षणात सारं संपलं, शेवटचं...
30 डिसेंबर रोजी पुण्यावरून परतल्यानंतर सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमारास उद्धव हाडबे हे घरात विश्रांती घेत होते. त्यावेळी त्यांची पत्नी मुलीला शाळेतून आणण्यासाठी बाहेर गेली होती. याच संधीचा फायदा घेत सुनील राऊत याने घरात जबरदस्तीने प्रवेश करत, जुन्या भांडणाचा राग काढत हातातील वस्तऱ्याने उद्धव यांच्या कानावर व गालावर जोरदार वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात उद्धव गंभीर जखमी झाले.
हल्ल्यानंतर उद्धव यांनी आरडाओरडा केल्याने सुनील राऊत यांची पत्नी रूपाली राऊत देखील घटनास्थळी आली. तिने उद्धव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. घरमालक रामराव तारडे व शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेत हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आणि जखमी उद्धव यांची सुटका झाली.
रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलिसांनी उद्धव हाडबे यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय परळी येथे दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. उपचारानंतर उद्धव हाडबे यांच्या फिर्यादीवरून सुनील व रूपाली राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात गंभीर कलमे लावण्यात आलेली नसल्याचा आरोप जखमीच्या नातेवाइकांनी केला असून, योग्य कारवाईची मागणी होत आहे.






