कोंबड्या का चोरल्या विचारलं? तर कुऱ्हाडीने डोकंच..., बीडच्या ‘त्या’ प्रकरणाबाबत मोठी अपडेट
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed News: कोंबड्या चोरल्यावरून वाद झाला. अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बीड: कोंबड्यांच्या चोरीचा जाब विचारल्याच्या कारणावरून बीडमधील एकाला कायमचं संपवलं होतं. या निर्घृण हत्येप्रकरणी भूम येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. जी. धर्माधिकारी यांनी दिलेल्या निर्णयानुसार आरोपीला जन्मठेपेचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ही घटना भूम तालुक्यातील ईट गावात घडली होती. आरोपी श्याम जालिंदर भोसले याने एका विधीसंघर्ष बालकाच्या मदतीने गावातील राखणीच्या क्षेत्रातून कोंबड्यांची चोरी केली होती. याबाबत मयत गारवा जाहिरात भोसले यांनी आरोपींना जाब विचारत, भविष्यात पुन्हा चोरी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तंबी दिली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने सूड उगवण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले.
advertisement
घटनेच्या दिवशी आरोपीने गारवा भोसले यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 205/2022 अन्वये भारतीय दंड विधान कलम 302 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक एस. एस. दळवे यांनी सांभाळली, तर दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी न्यायालयात सादर केले.
advertisement
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही फिर्यादी, अन्य साक्षीदारांचे म्हणणे आणि घटनास्थळी मिळालेला परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयाने महत्त्वाचा मानला. सर्व पुराव्यांची सखोल तपासणी केल्यानंतर आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या खटल्यात सरकारी पक्षाची बाजू अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. किरण डी. कोळपे यांनी मांडली. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलीस फौजदार बाजीराव बळे यांनी सहकार्य केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे गंभीर गुन्ह्यांबाबत कठोर भूमिका घेतली जात असल्याचा स्पष्ट संदेश समाजात गेला आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 1:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
कोंबड्या का चोरल्या विचारलं? तर कुऱ्हाडीने डोकंच..., बीडच्या ‘त्या’ प्रकरणाबाबत मोठी अपडेट







