ऑनलाइन रम्मीचा नाद, सिलेंडरचा अख्खा ट्रकच पळवला, प्लॅन असा की पोलिसही चक्रावले
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: मिळालेली रक्कम त्याने पुन्हा ऑनलाइन रम्मी खेळण्यात आणि मौजमजेत उडवल्याचेही तपासात समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगर: ऑनलाइन रम्मीमध्ये गमावलेली रक्कम परत मिळवण्याच्या नादात एका ट्रकचालकाने धक्कादायक पाऊल उचलले. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वतःच्या कामाच्या क्षेत्रातूनच चोरीचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नारेगाव येथील एचपीसीएल गॅस कंपनीच्या आवारातून भरलेला ट्रक पळवून 62 गॅस सिलिंडरची चोरी करण्यात आली. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह तिघांना गुन्हे शाखेने अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
विजय ऊर्फ गुड्डू विश्राम पवार (38, रा. नारेगाव) असे मुख्य आरोपी ट्रकचालकाचे नाव असून जगदीश ऊर्फ जिगर राजेंद्र पटेल (38, रा. घोडेगाव, ता. नेवासा) आणि अक्षय गणेश सोळुंके (27, रा. मूर्तिजापूर) अशी अटक करण्यात आलेल्या अन्य दोन आरोपींची नावे आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 डिसेंबरच्या रात्री नारेगाव येथील एचपीसीएल गॅस कंपनीच्या परिसरात ट्रक (क्र. एमएच 44 यू 2309) उभा होता. नेहमीप्रमाणे चालक सुंदर मुंडेने ट्रकची चावी गाडीतच ठेवली होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी विजय पवारने ट्रक पळवून नेला. त्यानंतर सावंगी–खुलताबाद मार्गे जात झाल्टा फाट्याजवळ ट्रक थांबवून साथीदारांच्या मदतीने 62 गॅस सिलिंडर दुसऱ्या वाहनात उतरवले आणि रिकामा ट्रक तेथेच सोडून दिला.
advertisement
चोरीनंतर विजय पवारने चोरलेले सिलिंडर अत्यंत कमी दरात विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याने 50 सिलिंडर अवघ्या दोन हजार रुपयांत जगदीश पटेलला, तर 10 सिलिंडर अक्षय सोळुंके याला विकल्याची कबुली दिली आहे. मिळालेली रक्कम त्याने पुन्हा ऑनलाइन रम्मी खेळण्यात आणि मौजमजेत उडवल्याचेही तपासात समोर आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण वाघ, योगेश नवसारे, विजय निकम यांच्या पथकाने कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी विजय पवारने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर घोडेगाव (जि. अहिल्यानगर) आणि मूर्तिजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे छापे टाकून एकूण 60 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले.
advertisement
दरम्यान, मुख्य आरोपी विजय पवार हा यापूर्वीही पोलिसांच्या नोंदीतील गुन्हेगार असून ऑनलाइन रम्मीचे व्यसन त्याला महागात पडल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक तूट भरून काढण्यासाठी त्याने हा चोरीचा मार्ग अवलंबल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 10:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
ऑनलाइन रम्मीचा नाद, सिलेंडरचा अख्खा ट्रकच पळवला, प्लॅन असा की पोलिसही चक्रावले











