नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ACB ची रेड, मोठा मासा गळाला, जालन्यात खळबळ
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Jalna News: दालनात टिफीन ठेवण्याच्या पिशवीत रक्कम ठेवून सात लाखाचा व्यवहार फायनल झाल्याचे सांगितले. हो म्हणताच एसीबीने पकडले.
जालना: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जालन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता रोहित देशमुख याला तब्बल 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पुनर्वसनातील 1 कोटी 88 लाख रुपयांची रक्कम खात्यावर वर्ग करण्यासाठी त्याने 7 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 4 लाख रुपये आधीच देण्यात आले होते, असे तक्रारदाराने सांगितले.
नेमकं घडलं काय?
पुनर्वसनासाठी शासनाकडून संपादित जमिनीचा मोबदला म्हणून सरकारकडून तक्रारदाराला 1 कोटी 88 लाख रुपये मिळणार होते. ही रक्कम वर्ग करण्यासाठी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता रोहित देशमुखने मोठ्या रकमेची मागणी केली. शेवटी 7 लाख रुपयांची लाच घेऊन पैसे वर्ग करण्याची तयारी दाखवली. त्यासाठी पहिल्या हप्त्यात 4 लाख रुपये आधीच घेतले.
advertisement
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार
गावठाण घराच्या संपादनाचा शासकीय मोबदला मिळण्यासाठी अडव्हान्स म्हणून तक्रारदाराच्या सहीचे कोरे चेक घेतले होते. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने सुरुवातीला 4 लाख रुपयांची लाच दिली. त्यानंतर पैसे वर्ग झाले. मात्र, लाचेची उर्वरित रक्कम मागितल्यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीवर वाटूर फाटा इथे 30 डिसेंबर रोजी पडताळणी करण्यात आली.
advertisement
लाचलुचपतचा सापळा
view comments1 जानेवारी रोजी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात एलसीबीकडून सापळा रचण्यात आला. रोहित देशमुख यांच्या दालनात तक्रारदार यांनी टिफिन ठेवण्याच्या पिशवीत रक्कम ठेवून सात लाखाचा व्यवहार फायनल झाल्याचे सांगितले. देशमुख यांनी 'हो' म्हणून संमती दर्शवली. तक्रारदार यांनी इशारा करताच कार्यकारी अभियंत्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी 50 हजारांच्या चलनी नोटा आणि 50 हजार रुपयांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच अंगझडतीत 9 हजार रुपये रोख, ॲपल कंपनीचा मोबाईल इत्यादी जप्त करण्यात आले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 10:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ACB ची रेड, मोठा मासा गळाला, जालन्यात खळबळ









