बीड जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने दुष्काळाचे खूप मोठे संकट ओढवले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच जिल्ह्यातील मध्यम लघु प्रकल्पापैकी 143 प्रकल्पात अवघे 13 टक्के पाणी उरले आहे. तर यापैकी 50 तलावांनी तळ गाठला आहे. पुढील तीन महिने पाणी कसं मिळणार हा प्रश्न बीड जिल्ह्यातील नागरिकांसमोर आहे. छोटी मोठी तलाव आणि धरणे कोरडी पडत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा आणि पाणी टंचाईला सुरूवात झाली.
advertisement
पाच वर्षातील सर्वाधिक घट
ही परिस्थिती भूपृष्ठावरील पाण्याची आहे तर दुसरीकडे भूगर्भातील पाणी देखील दीड मीटरने खोल गेले आहे. यावर्षी जिल्ह्यात भुगर्भातील पाणीपातळी 1.87 मीटरने आक्टोबर अखेर खालावलेली आहे. तर जानेवारीची आकडेवारी देखील तेवढीच आहे. त्यामुळे विहीर, बोअरवेल आटले आहेत. भूगर्भातील पाणी बेसुमार उपसा थांबवणे गरजेचं आहे. बोरवेलच्या माध्यमातून निघणारे पाणी फक्त पिण्यासाठी वापरावे ते जर शेतीसाठी वापरले तर भूगर्भातील पाणीसाठे देखील संपतील अशी भीती वरीष्ठ भूवैज्ञानिक रोहन पवार यानी सांगितलं. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील 126 विहिरींच्या पाणी पातळीचा अभ्यास केला आहे. पाच वर्षाच्या सरासरीत मोठी घट झाली आहे.
वाचा - viral : तुम्हाला माहितीये का, विहीर गोलच का असते? कधी चौकोनी किंवा त्रिकोणी का नसते?
बीड जिल्ह्यात भूपृष्ठासह भूगर्भातील पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बीडकर यांनी पाणी जपून वापरावे व भूगर्भातील बेसुमार पाणी उपसा थांबवावा असे आवाहन केलं जातं आहे. फेब्रुवारी महिन्यात ही परिस्थिती आहे तर पुढील उन्हाळ्याचे चार महिने किती कठीण असतील याची कल्पना न केलेली बरी.
