हे प्रकरण १७ वर्षे वयाच्या दोन मुले आणि दोन मुलींशी संबंधित आहे. हे चौघेही आधीपासूनच वर्गमित्र होते. दहावी उत्तीर्ण झाल्यावर त्यापैकी दोघांनी शाळा बदलली, तरीही बारावीची ट्यूशन एकच असल्याने ते कायम संपर्कात राहिले. याच दरम्यान, दोन मुलांपैकी एकाचे एका मुलीकडे आकर्षण वाढले. त्यानंतर त्याने तिचा पिच्छा पुरवणे, पाठलाग करणे आणि प्रेमसंबंधांसाठी दबाव टाकणे सुरू केले.
advertisement
त्याला त्याच्या अन्य तिघा वर्गमित्रांनीही मदत केली. या सततच्या त्रासामुळे पीडित मुलगी खूप वैतागली. या मानसिक तणावामुळे तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा विचार केला. शेवटी तणावग्रस्त अवस्थेतील मुलीने ही सर्व हकीकत आपल्या आई-वडिलांना सांगितली. तिच्या पालकांनी तिला धीर दिला आणि रविवारी पवनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन मुले आणि एका मुलीविरुद्ध गुन्हा नोंदवला. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८, १२६(२), ३५१(२) आणि पोक्सो कायद्यातील कलम १२, १६ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली होती. मात्र, सोमवारी त्यांना जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.