मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी भंडारा पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. यात दोन सख्ख्या भावांसह नागपूरच्या दोघांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
मृत व्यक्तींची नावे वसीम उर्फ टिंकू खान आणि शशांक गजभिये अशी आहेत. टिंकू खान हे त्यांच्या मुस्लिम लायब्ररी चौकातील कार्यालयात बसले असताना त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या शशांक गजभिये यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेनंतर मध्यरात्री भंडारा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मुस्लिम लायब्ररी चौक आणि मिस्कीन टँक परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
आज सकाळी फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन तपास केला आणि महत्त्वाचे पुरावे गोळा केले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चार आरोपींची चौकशी सुरू असून, या हत्येमागचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे भंडारा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.