भंडारा शहरात गणपती दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गणेशोत्सव साजरा करून परत जात असताना एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची आई आणि चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाले. ही घटना भंडारा शहरातील साई मंदिरासमोर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
advertisement
मृत व्यक्तीचे नाव संतोष चकोले वय 35 वर्षे असून ते मोहाडी तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी होते. संतोष आपल्या पत्नी आणि मुलासह सायंकाळी भंडारा शहरातील गणेश मंडळांनी तयार केलेले देखावे आणि मूर्ती पाहण्यासाठी आले होते. गणेश दर्शन करून घरी परत जात असतानाच त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की संतोष यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि मुलगा या अपघातात जखमी झाले आहेत. या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिसांनी ट्रकचालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे. पुढील तपास भंडारा पोलीस करत आहेत. या दुर्घटनेत चिमुकल्या मुलाने वडिलांचं छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली आहे.