नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. यावेळी गाडेकर कुटुंब गाढ झोपेत होते. अज्ञात हल्लेखोरांनी नियोजित कट रचून सचिन गाडेकर यांच्या घराच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब फेकले. क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले आणि घराच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांना आपल्या विळख्यात घेतले. सुदैवाने, आगीचा भडका उडताच कुटुंबातील सदस्यांना जाग आली आणि त्यांनी प्रसंगावधान राखून सुरक्षित बाहेर पळ काढला, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
advertisement
पाच वाहने जळून खाक
या आगीत घरासमोर पार्क केलेल्या चार दुचाकी आणि एक चारचाकी कार पूर्णपणे जळून खाक झाली. आगीमुळे घराच्या काही भागाचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला.
राजकीय वैमनस्यातून हल्ला?
"हा केवळ वाहने जाळण्याचा प्रयत्न नव्हता, तर आमच्या संपूर्ण कुटुंबाला जिवंत जाळण्याचा कट होता," असा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य सचिन गाडेकर यांनी केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद किंवा राजकीय वैमनस्यातून हा जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. पहाटे घरावर हल्ला करणारे आरोपी नक्की कोण होते? याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.
