नेमकं प्रकरण काय?
अनिल राऊत असं अटक केलेल्या नराधम शिक्षकाचं नाव आहे. तो मागील पाच वर्षांपासून पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने याच शाळेतील पाच निष्पाप मुलींसोबत अश्लील आणि लैंगिक कृत्य केलं. इतकेच नाही, तर या कृत्याबाबत कुणाला काहीही सांगितल्यास 'जीवे मारण्याची धमकी' देऊन त्याने मुलींना घाबरवलं होतं.
advertisement
एका मुलीच्या धैर्यामुळे कांड उघडकीस
आरोपीच्या या कृत्यामुळे मुली प्रचंड दहशतीखाली होत्या. मात्र, अत्याचार सहन न झाल्याने अखेर एका पीडित मुलीने आपल्या पालकांकडे धाडसाने सर्व हकीकत सांगितली. आपल्या मुलीसोबत घडलेला हा प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. याबाबत अधिक चौकशी केली असता नराधमाने अशाप्रकारे शाळेतील इतर मुलींचं देखील शोषण केल्याचं समोर आलं.
या सगळ्या प्रकारानंतर संतप्त झालेल्या पालकांनी थेट शाळा गाठून आरोपी शिक्षक अनिल राऊत याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर तात्काळ पवनी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने शाळेत धाव घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी पीडित मुलींच्या पालकांच्या तक्रारीवरून आरोपी अनिल राऊत याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो - POCSO) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. त्याने आणखी काही मुलींना अशाप्रकारे लक्ष्य केलं आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
