अहमदनगर, 24 डिसेंबर : भंडारदऱ्यामध्ये सांधण व्हॅली पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. व्हॅली पाहण्यासाठी आलेल्या पर्यटक महिलेचा पाय घसरला आणि ती दरीमध्ये कोसळली. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. ऐश्वर्या खानविलकर असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव असून ती 24 वर्षांची आहे.
लॉन्ग विकएंडमुळे मुंबईहून तरुणींचा ग्रुप भंडारदऱ्याला फिरण्यासाठी आला होता. या ग्रुपसोबतच ऐश्वर्या आली होती, पण सांधण व्हॅली पाहत असतानाच तिचा पाय घसरला आणि ती पडली. यानंतर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने ऐश्वर्याला बाहेर काढण्यात आलं, पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
advertisement
ख्रिसमसची सुट्टी आणि शनिवार-रविवारमुळे जोडून आलेला लॉन्ग विकएंड यामुळे भंडारदरा परिसरात पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन वनविभाग आणि पोलिसांनी केलं आहे.
दुसरीकडे शनिवारपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर 30-35 किमीच्या रांगा लागल्या होत्या. अखेर ही वाहतूक कोंडी फोडण्यात वाहतूक विभाग आणि पोलिसांना यश आलं. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड आणि जड वाहनांनी या तीनही दिवशी दुपारी बारानंतर घाटातून प्रवास करावा, असं आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आलं.
रायगड महामार्ग पोलिसांकडून मुंबईहून पुण्याला येणारी लेन आणि पुण्याहून मुंबईला जाणारी लेन या दोन्हीही लेनवर मुंबईकडून येणारी वाहतूक सुरू केल्याने बोरघाटातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आली. शनिवार-रविवार सुट्टी आणि सोमवारी ख्रिसमसची सुट्टी आल्यामुळे लोणावळ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती.
