भिवंडी: ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. न्यायालयातून पसार झालेल्या एका विकृत आरोपीने पुन्हा एकदा एका सात वर्षांच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, पीडितेचा मृतदेह आरोपीने गोणीत भरून पळ काढला होता. पण भिवंडी पोलिसांनी या आरोपीला अवघ्या ५ तासांमध्ये अटक केली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुरडीवर अत्याचार करून हत्येच्या घटनेनं पुन्हा एकदा भिवंडी हादरली. न्यायालयातून पसार झालेल्या आरोपीने दुष्कृत्य केल्याचं समोर आलं आहे. सलामत अन्सारी असं या नराधमाचं नाव आहे. सप्टेंबर 2023 मध्ये याच आरोपीने शहरातील फेणेगाव इथं सहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केली होती. पोलिसांनी त्याला अटकही केली होती, पण तो पोलिसांच्या तावडीतून पळाला होता आणि आता तसंच कृत्य एका ७ वर्षांच्या चिमुरडीसोबत केलंय.
अधिक माहिती अशी की, दिनांक ०१/१०/२०२५ रोजी दुपारी १४.५५ वा ते संध्याकाळी १८.०५ वाजेच्या दरम्यान, मांगतपाडा, काटगाव, भिवंडी येथे नमुद फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय ०७ वर्ष ही आरोपी सलामतअली आलम अन्सारी याने तिला खाऊचे आमिष देऊन खोलीमध्ये घेवून गेला आणि तिथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. त्यानंतर या अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून केला. मृत मुलगी घरी न आल्यामुळे सर्वत्र शोध घेतला असता आरोपीचं कृत्य समोर आलं. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपीला पाच तासांमध्ये अटक केली.
याआधीही अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून केला होता खून
धक्कादायक म्हणजे, आरोपी सलामतने याआधीही एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केला होता. त्याच्यावर भादंवि कलम ३०२,३६३, ३७६, बालकांचे लैंगिक अपराधापासन संरक्षण अधिनियम कलम ४, ८, १२ प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये त्याला भिवंडी न्यायालयामध्ये हजर केलं होतं. त्यावेळी न्यायालयाच्या आवारातून गर्दीचा फायदा घेवून पळून गेला होता. त्यानंतर त्याला सलामत अलीला बिहारमधील मधेपुर इथं जाऊन पकडण्यात आलं होतं. सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आणि संवेदनशील असल्यानं घडलेल्या घटनेमुळे सदर परिसरात संताप आणि भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.
पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, 'आरोपीला आमच्या समोर फाशी द्या नाही तर आमच्या हवाली करा', अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांची केली.