निवडणुकीच्या प्रतिष्ठेतून वादाची ठिणगी
भिवंडी निजामपुरा महापालिका निवडणुकीत यावेळी कोणार्क विकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. यामध्ये कोणार्क विकास आघाडीने भाजपचा पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेषतः प्रभाग क्रमांक १ ची निवडणूक संपूर्ण शहरात प्रतिष्ठेची ठरली होती. या प्रभागात कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्यासमोर भाजप आमदार महेश चौगुले यांचे सुपुत्र सुमित चौगुले यांचे कडवे आव्हान होते. मात्र, या चुरशीच्या लढतीत कोणार्क विकास आघाडीच्या पॅनेलने भाजपचा पराभव केला. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही गटांत सुप्त संघर्ष सुरू होता.
advertisement
बाटल्यांचा वर्षाव आणि दगडफेक
निवडणुकीचा निकाल लागून दोन दिवस उलटल्यानंतर या वादाचा स्फोट झाला. शिवाजी चौकात दोन्ही बाजूंचे जवळपास २०० ते २५० समर्थक आमनेसामने आले. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, मात्र त्याचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर सोड्याच्या बाटल्या, दगड आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला करण्यात आला. इतकेच नव्हे तर भाजप कार्यालयासमोरील खुर्च्यांचीही तोडफोड करत एकमेकांना मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि लाठीचार्ज
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. सध्या शिवाजी चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
या घटनेची अधिक माहिती देताना भिवंडीचे डीएसपी शशिकांत बोराटे यांनी सांगितलं की, हा सगळा प्रकार भिवंडीतील शिवाजी चौक परिसरात घडला. इथं दोन्ही बाजुच्या जवळपास २०० ते २५० जणांच्या मॉबने एकमेकांवर हल्ला केला. या वेळी दोन्ही बाजुने तुफान दगडफेक झाली. लाकडी दांडके आणि खुर्च्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लाठीचार्ज करून गर्दी पांगवली आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
