ही आग इतकी तीव्र होती की, गोदामातून आगीच्या उंचच्या उंच ज्वाला दिसत होत्या. या गोदाम संकुलातील शाडो फॅक्स, बर्ड व्हिव्ह कुरिअर गोदामांसह त्याच्या शेजारील केमिकल गोदाम देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. गोदामात मोठ्या प्रमाणात कुरिअर साहित्य आणि केमिकलचा साठा असल्याने आग झपाट्याने पसरली आणि त्यावर नियंत्रण मिळवणे अग्निशमन दलासाठी एक मोठे आव्हान ठरले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच तातडीने भिवंडीसह कल्याण आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पाच गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सध्या शर्थीचे प्रयत्न करत आहेत. केमिकलमुळे आग भडकल्याने जवानांना फोम आणि पाण्याचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमामुळे आग इतर गोदामांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात मदत मिळाली.
आग लागण्यामागे शॉर्ट सर्किट हे प्राथमिक कारण असल्याचे समोर आले आहे. ही मोठी दुर्घटना असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली आहे, ही एकमेव दिलासादायक बाब आहे. मात्र, आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे ड्युटी इन्चार्ज नितीन लाड हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना त्वरित वैद्यकीय मदत पुरवण्यात आली.
भिवंडीसारख्या औद्योगिक वसाहतीमध्ये गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांनी गोदामांच्या सुरक्षिततेच्या मानकांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या वारंवार होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कठोर पाऊले उचलणे आणि गोदामांमध्ये सुरक्षा मानकांचे पालन होते की नाही, यावर गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.