गणेश जगताप असं आरोपीचं नाव आहे. तो निफाड तालुक्यातील धरणगाव येथील रहिवासी आहे. याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गणेश जगताप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गणेश जगताप याने जादूटोण्याची भीती दाखवत तिचा गैरफायदा घेतला. त्याने मागील १४ वर्षांपासून ब्लॅकमेल कर तिचा लैंगिक छळ केला. "तू मला आवडतेस आणि तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो," असे सांगत त्याने सुरुवातीला महिलेवर दबाव आणला. तसेच त्याने एका पुस्तकात पीडितेच्या पतीसह मुलांची नावं लिहिली होती. "जर माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत, तर पुस्तकातील नावांपैकी एकाचा बळी जाईल," अशी भीती दाखवून आरोपीनं तिच्यावर अत्याचार केला.
advertisement
आरोपीच्या धमक्यांना घाबरून पीडित महिला २०१० पासून आतापर्यंत अनेकवेळा या भोंदूबाबाच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडली. लैंगिक अत्याचारासोबतच त्याने महिलेच्या कुटुंबियांची सुमारे ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक देखील केली. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने अखेर इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. भोंदूबाबा गणेश जगताप याच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच हा भोंदूबाबा पसार झाला आहे. सध्या इंदिरानगर पोलिसांचं पथक फरार भोंदूबाबाला पकडण्यासाठी रवाना झालं आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणखी काही महिला या भोंदूबाबाविरुद्ध तक्रारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
