गुरुवारी २२ जानेवारी रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सकाळी अकरा वाजता मंत्रालयाच्या परिषद सभागृहात ही प्रक्रिया पार पडली जाणार आहे. याबाबत आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच राज्यातील २९ महानगर पालिकांमध्ये कोण महापौर होणार? हे निश्चित होणार आहे.
आरक्षणाच्या पद्धतीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता
आतापर्यंत महापौर पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), महिला आणि इतर मागास प्रवर्ग (OBC) यांच्यासाठी रोटेशन पद्धतीने आरक्षण निश्चित केलं जात होतं. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, नियमात नवीन बदल करून ही आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने नव्याने सुरू केली जाऊ शकते. याचा अर्थ असा की, आरक्षणाचे हे चक्र पुन्हा 'खुला प्रवर्ग' पासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
advertisement
'चक्राकार' पद्धतीचे महत्त्व
महापौर पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यामागे एक मुख्य उद्देश असतो. तो म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला आणि प्रवर्गाला शहराच्या महापौर पदावर बसण्याची समान संधी मिळावी. यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आणि यापूर्वी कोणत्या प्रवर्गाला संधी मिळाली आहे, याचा विचार करून पुढील आरक्षण ठरवले जाते.जर आरक्षण सोडत पुन्हा 'ओपन'पासून सुरू झाली, तर अनेक दिग्गज नेत्यांना महापौर पदाची संधी मिळू शकते.
